माघ शुध्द पंचमीस ” वसंत पंचमी ” म्हणतात. ना धड थंडी, ना ऊन , पण वातावरणात एक अनामिक चैतन्य, उल्हास भरलेला हा दिवस.शिशिर चोर पावलाने जाण्याच्या मार्गावर असतो तर येणाऱ्या वसंताचे स्वागत करण्यासाठी सर्व सृष्टी आपले अंग-प्रत्यंग फुलवून त्याच्या आगमनाची तयारी करत असते.यात पळसाची लाल भडक फुले, आंब्याला आलेला सुगंधित मोहर, भ्रमरांचे गुंजन, मध्येच कोकीळ पक्षाचा लागलेला पंचम असं मंत्रमुग्ध करणारा दिवस म्हणजे वसंत पंचमी.
श्रीविष्णूंनी जेव्हा ब्रम्हदेवास सृष्टी निर्माण करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सृष्टी तर निर्माण केली पण ती मौन, उदास होती.ब्रम्हदेवांनी यासाठी श्रीविष्णूंचा धावा केला व याचे कारण विचारले, तेव्हा श्रीविष्णूनी महामाया दुर्गेस पाचारण केले.दुर्गादेवी क्षणार्धात तेथे प्रगट झाली व तिने दोघांना स्मरण करण्याचे कारण विचारले.तेव्हा ब्रम्हदेवांनी सृष्टीच्या मौन असण्याबद्दल सांगितले, तेव्हा श्रीदुर्गेच्या शरीरातून एक प्रचंड शक्ती निर्माण झाली, जीने चतुर्भुज रूप घेऊन एका सुंदर स्त्रीचे स्वरूप साकार केले.या शक्तीच्या एका हातात वीणा, एक हात अभयकर होता.तर दुसऱ्या दोन हातात माळ आणि कमंडलू होता.हीच ती महासरस्वती. जीचा उद्भव आजच्या म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी झाला.तिची चतुरंगी कोमल बोटे जेव्हा विणेवरून फिरली, तेव्हा त्यातून झंकार निर्माण झाले आणि संगीत जन्माला आले आणि सर्व सृष्टी चेतनामय आणि बोलती झाली.आज त्यामुळे महासरस्वतीचे पूजन केल्या जाते.सर्व कलाकार गायक, वादक, नर्तक, नर्तकी हे आज सरस्वती पूजन करतात.
आजच्या दिवशी कामदेवाचे देखील पूजन केले जाते.कामदेव आणि वसंत हे एकमेकांचे दोस्त आहेत, त्यामुळे कामदेवाचा बाण देखील फुलांचा असतो.कामदेवाचे एक नाव ” अनंग ” म्हणजे ज्याला अंगच नाही, तो प्रत्येक प्राणिमात्रांच्या मनात लपलेला आहे.त्याचा बाण हा लागतो, पण ती वेदना हृदय विदीर्ण करून देखील हवीहवीशी वाटते.म्हणूनच कदाचित प्रेमी युगुल आपले प्रेम हृदयाच्या आकारात तिर मारलेला असे व्यक्त करतात.आज मदन म्हणजे कामदेव व रती या दोघांचे पूजन केले जाते.भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघडून मदनास भस्म केले होते तेव्हा रतीच्या विलापाने शंकराने मदनास उ:शाप देऊन द्वापारयुगामध्ये श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न म्हणून जन्माला येशील आणि रती श्रीकृष्ण स्नुषा होईल असे वरदान दिले होते.
असा हा वसंत ऋतूची चाहूल सांगणारा दिवस हा अत्यंत आल्हाददायक, उत्साहवर्धक व वातावरणात एक उन्माद, स्फूर्ती व तारुण्याची धुंदी, नशा चढविणारा असतो पण हाच वसंत ऋतू येणाऱ्या ग्रीष्माची देखील जाणीव ठेवा हेही सांगतो. केवळ तारुण्य, उन्माद म्हणजे संसार नाही तर त्यात ग्रीष्माच्या झळा देखील आहेत हेही तो सांगतो.
आपणही आजच्या वसंत पंचमी निमित्य ह्या वसंताचे स्वागत करूया.
No comment